Monday, 21 August 2023

कोरी पाटी ..

कोरी पाटी ..


माझे दुःख त्याला एकाचे नसते, पण त्याचे दुःख सांगायला त्याला माझ्यापाशी बोलावे वाटते. रडायला, मन मोकळे करायला माझा खांदा हवा असतो आणि माझी सोबत हवी असते. त्याला जे बोलायचे असते ते ऐकायला, त्याच्यावर माझे मत द्यायला, चर्चा करायला, सगळ्या सगळ्याला मी हवी असते. मी जरा जास्त बोलते. माझी एक मैत्रीण पण मला बोलते कि, "तू किती बडबडी आहेस ग, जो भेटेल त्याच्याशी बोलत बसतेस"! पण आता तो माझा स्वभावच आहे. मला विस्तारून सांगायला आवडते. मला उलगडून सांगायला आवडते. मला नेमके नाही येत बोलता. घोळून, चवीने, सगळं प्रसंग घडी घडणे उलगडून सांगायला आवडतो. पण त्याला नसतो तास ऐकायचा. त्याला नेमकेपणा आवडतो. बाकी सगळा त्याला फापटपसारा वाटतो. मग सुरु होतो तोच एक खेळ .. उं सावलीचा. ज्या खेळात सध्या ऊन भयंकर आहे. सहन न होण्याइतकं. चूक माझीच आहे. नेहमीप्रमाणे. मला ती मान्य असतेच. मी नाही म्हणतच नाही. नेहमीप्रमाणे. पण टाळी एका हाताने नाही वाजत ना? माझी असेल ८०% चूक तर त्याचीही २०% असेलच ना. अर्थात नवरा बायकोच्या नादात कुठे अशी टक्केवारी काढतो आपण. यावेळी फरक एवढाच आहे कि मला चूक सुधारावी वाटत नाही. मला त्यासाठी प्रयत्न हि करावासा वाटत नाही. तसंही त्याच्या म्हणण्याप्रमाणे माझ्या चुका मी सुधारत नाहीच ! मग मी कितीही प्रयत्न केला, तरी त्याचं हे मत बदलणार थोडीच आहे? म्हणून या वेळी मला तो प्रयत्न हि करायचा नाही. मला मनापासून वाटेल, पटेल तेव्हा ती आपोआप सुधारली जाणार आहे. तोवर मला हे भिजत घोंगडं असाच ठेवायचं आहे. आधी मला असे आवडायचे नाही. एक घाव दोन तुकडे करायला आवडायचे. आता सगळ्यातुनच अंग काढून घ्यायचे असे ठरवले आहे. 


सगळे कसे मला मनमोकळे, निवांत, हळू हळू आस्वाद घेत केलेले आवडते. त्याला मात्र परफेक्ट, नेमकेच, विशिष्ठ आणि परिणामांचा विचार करून केलेलं आवडतं. मी नाही करू शकत सारखाच विचार परिणामांचा किंवा नेहमीच नाही विचार कौन बोलू शकत. नेहमी नियोजन नाही करू शकत. तो माझा पिंडच नाही. मला spontaneously  सुचतं आणि तसं जेव्हा सुचतं तेव्हा ते जास्त खुलतं, रुचतं आणि भावतं सुद्धा. मलाच नाही तर इतरांनाही. इतरांना आवडो, न आवडो. मी इतरांसाठी कधीच जगले नाही. मी माझ्यासाठी जगते. आणि त्यात काही वावगं वाटत नाही. अरे मला माझं आयुष्य आहे. मला, माझ्या पद्धतीने जगण्याचा अधिकार आहे. आणि एकदाच मिळतं. पुनर्जन्मावर माझा विश्वास नाही. मिळालाच तरी मला सगळंच आठवेलच कश्यावरुन? असो.. विनोदाचा भाग वगळता, दुसऱ्याच्या इशाऱ्यावर आपलं आयुष्य जगायला मला आवडतच नाही. मी नेहमी म्हणते, "अरे! मी थोडीच कुणावर अवलंबून आहे? मिंधी आहे? ज्याचा त्याचं मनाचा विचार करण्याचा ठेका मीच घेतलाय का? मी माझं आयुष्य इतरांचा विचार करण्यात का घालवू वाया?" इतरांप्रमाणे का जगू मी ? मी स्वच्छंद आहे. स्वतंत्र आहे. स्वेच्छ आहे. मला नाही येत दुनियादारी. आणि मला ती शिकायची हि नाही. असं वागलं तर असं होईल. तसं वागलं तर तसं होईल. मी माझं वागणं दुनियेसाठी का बदलू? वागणं आपसूक होतं, आपोआप होतं. सहज वागेन. माझी होऊन  राहीन. मला कुणी नसले तरी चालेल. मी अंतर्मुख होईन. माझ्यात झाकेन. आणि मार्ग शोधेन.मला नाही फिकीर. मला तो मार्ग केव्हा सापडेल, सापडेल कि नाही? मला नाही माहित. पण मी चालत राहीन. क्षितिजापर्यंत. दूरवर आभाळाचे छत घेऊन. जमिनीच्या चटईवर. अथांग, अविरत. तो आला तर त्याच्या सोबत. त्याचा हात धरून आनंदाने आणि नाही आला तर त्याच्या शिवाय आणि तरीही आनंदाने! माझा आनंद आता कुणा दुसऱ्यावर अवलंबून नसणारे! तो माझा मला घेता येणारे. माझी पाटी कोरी आहे, फुटकी नाहीये..पुसट आहे.. पूर्णतः पुसलेली नाहीये. जोवर आशेचा अंकुर असतो तोवर पालवी फुटतेच.  

2 comments:

  1. फारच छान लिहिलंय मॅडम.

    ReplyDelete
  2. Krishna The peacemaker21 August 2023 at 10:03

    👌👌

    ReplyDelete